मीरा रोड : दोन वर्षांपूर्वी भाईंदर पश्चिमेला जय बजरंगनगर येथे कांदळवनात सुमारे ७० लाख रुपये खर्चून मीरा-भाईंदर महापालिकेने बेकायदा बांधलेली फायबरची दाेन शौचालये पालिकेनेच काढून नेल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. तर वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची धास्ती असल्याने पालिका ठेकेदारांमार्फत हे शौचालय काढल्याची चर्चा आहे.
दोन-अडीच वर्षांपूर्वी उभारलेल्या शौचालयप्रकरणी कांदळवन समितीच्या पाहणीनंतर पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे कांदळवन क्षेत्र वन कायद्याखाली राखीव वन जाहीर झाले. जेणेकरून हा गुन्हा वन कायद्यानुसार दाखल करण्यात यावा, असा प्रस्ताव देण्यात आला. वन कायद्याखाली गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच पालिकेने अचानक हे शौचालय काढून घेतले. जेणेकरून या परिसरातील कांदळवन क्षेत्रात सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रहिवाशांनी अन्यत्र पर्यायी शौचालय बांधण्याची मागणी केली असून, महापालिका मुख्यालयात धरणे धरण्यात आले होते. कांदळवन असल्याची माहिती असूनही हे शौचालय बांधून पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे.