ठाणे : ठाण्यातील काही भागांत झालेल्या अनधिकृत बांधकामांकडे महापालिका अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. चार ते पाच मजल्यांच्या इमारती आणि टॉवर केवळ लॉकडाऊनच्या काळात होऊ शकत नाही, तर आधीपासून ही बांधकामे सुरू असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहे. यावर प्रशासनाने खुलासा करावा, असे निर्देश देऊन यासंदर्भात त्यांनी अतिक्रमणविरोधी विभागाच्या आयुक्तांना पत्रदेखील दिले आहे. ठाण्याच्या प्रथम नागरिक या नात्याने प्रसिद्धिमाध्यमांना काय प्रतिक्रिया देऊ, याविषयी मार्गदर्शन करावे, असा टोलादेखील त्यांनी अतिक्रमण विभागाला लगावला आहे.
कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये प्रशासनाची सर्व यंत्रणा गुंतल्याचा फायदा घेऊन लॉकडाऊनकाळात कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा टाकला. यामध्ये कळवा आणि दिवा परिसरात एकाच वेळी कारवाई केली. कळव्यात एकावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हादेखील दाखल केला. मात्र, या कारवाईनंतर आता कळवा, खारेगाव आणि दिवा परिसरांत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासकीय यंत्रणा अडचणीत आली असून यासंदर्भात महापौरांनीच अतिक्रमण विभागाकडे खुलासा मागवला आहे.