ठाणे : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने पनवेल (नवी मुंबई) मधून अटक केली आहे. या तिन्ही मुलांना तसेच त्यांचे अपहरण करणा-या दोघांना अशा पाच जणांना बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.गोरखपूर येथून दोन अल्पवयीन मुली आणि तीन मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी दाखल झाला. ही मुले मुंबई परिसरात असल्याची माहिती कैम्पियरगंज (उत्तर प्रदेश) पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मृत्युंजयकुमार पांडेय यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे या अपहरण प्रकरणात मदतीची मागणी केली. त्यानुसार, गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला ही मदत करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिले होते. आपल्या खबºयांच्या आधारे तसेच मोबाइल टॉवरच्या माध्यमातून ही मुले पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील बांधकाम साइटवर असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. ते पनवेलच्या कच्छी मोहल्ला भागात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर या मुलांना ८ नोव्हेंबर रोजी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.प्रद्युम्न ऊर्फ विद्यासागर निषाद (२१) हा गेल्या तीन वर्षांपासून पनवेल येथे सेंट्रिंगचे काम करत होता. तो अधूनमधून त्याच्या सोनौरा (जि. गोरखपूर) गावी जात होता. त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले. त्याचा मित्र अखिलेश निषाद (१९) याचेही त्याच गावातील अन्य एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते.
अपहरण झालेल्या तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 3:48 AM