मीरारोड - भाजपाचे पालिका निवडणुकीतील उमेदवार तथा माजी नगरसेवकाच्या पालिका नगरसेवक निधी मधुन बांधलेले सार्वजनिक वाचनालय भाजपाच्याच प्रभाग समिती सभापतीने तक्रार करुन तोडालया लावल्याचा प्रकार भार्इंदर पुर्व भागात घडलाय. या मुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असुन पदाचा वापर आपले राजकिय उट्टे काढण्यासाठी केले जात असल्याची चर्चा रंगली आहे. तर पालिकेच्या निधीची नासाडी झाल्याने त्या बद्दल कारवाईची मागणी होत आहे. आॅगस्ट मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भार्इंदर पुर्वेच्या प्रभाग ३ मधुन भाजपाचे गणेश शेट्टी हे निवडुन आले आहेत. याच प्रभागातुन भाजपाचे अन्य उमेदवार हंसुकुमार पांडेय, मनिषा पिसाळ आदी पराभुत झाले. तर सेनेचे दिनेश नलावडे, निलम ढवण व अर्चना कदम विजयी झाले. हंसुकुमार पांडेय हे पुर्वी काँग्रेसचे नगरसेवक होते. पालिका निवडणुकी आधी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर शेट्टी हे पुर्वी मनसेच्या तिकीटावर निवडुन आले होते. नंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत ते देखील भाजपात डेरेदाखल झाले. पांडे व शेट्टी हे एकाच परिसरातील असल्याने दोघां मध्ये फारसं जमत नाही. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत देखील पांडे यांना त्याचा फटका बसला व ते पराभूत झाले. नगरसेवक असताना पांडे यांनी २०१३-१४ च्या आपल्या नगरसेवक निधी मधुन प्रभागात दोन लाखाच्या खर्चातुन तीन ठिकाणी सार्वजनिक वाचनालयं बांधली होती. त्यातील स्वामी विवेकानंद मार्गावरील निर्मल पार्क येथे एक वाचनालय बांधले होते. सदर वाचनालया वर नियमीत पणे वृत्तपत्रं वाचण्यासाठी उपलबध्द केली जात होती. ज्येष्ठ नागरीक आवर्जुन वर्तमानपत्र वाचत बसत. परंतु सदर वाचनालयाची तक्रार प्रभाग समिती सभापती बनलेल्या भाजपाच्याच गणेश शेट्टी यांनी पालिके कडे केली होती. शेट्टी यांच्या तक्रारी नंतर प्रभाग समिती ३ मधील पालिका पथकाने पांडे यांचे नगरसेवक निधीतुन बांधलेले वाचनालय काढुन टाकले. सदर बाब हंसुकुमार पांडे यांना कळताच ते संतप्त झाले. त्यांनी या प्रकरणी थेट आमदार नरेंद्र मेहतां कडे तक्रार करत नाराजी व्यक्त केली. पांडे मात्र संतप्त झाले असुन पालिका निधीतुन झालेले वाचनालय काढलेच कसे ? असा सवाल त्यांनी केलाय. पालिकेने काढलेले वाचनालय उड्डाणपुला खाली अन्य भंगारात टाकण्यात आले आहे. एकीकडे परिसरात लॉज, बार व अन्य बांधकामां विरुध्द ठोस कारवाई ची गरज असताना त्याऐवजी शेट्टी यांनी आपल्याच पक्षाच्या हंसुकुमार पांडे यांचे पालिका निधीतले वाचनालय तोडायला लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालिकेच्या निधीची नासाडी झाल्याने त्या बद्दल कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:42 PM