सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रातून दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री सुटलेल्या दुर्गंधीने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना डोकेदुखी, उलट्या व श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. नदी पात्रात केमिकल युक्त सांडपाणी सोडण्यात आल्याने, परिसरात दुर्गंधी सुटल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली.
उल्हासनगरच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराची जीवनवाहिनी ऐवजी शाप ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नदी पात्रात दुसरी कडून आणलेली केमिकल युक्त सांडपाणी नदीत सर्रासपणे सोडले जात असल्याने, यापूर्वी टँकरचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नदी किनाऱ्यावरील अंबरनाथ येथील केमिकल कारखाने सांडपाणी सोडले जात असल्याने, प्रदूषण मंडळाने यापूर्वीच काही कारखान्यांना नोटिसा देऊन गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री नदी पात्रातून उग्र दर्प येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येऊन अनेक नागरिक रस्त्यावर आले. नागरिकांना श्वास घेण्यास, डोकेदुखी व उलट्या आदींचा त्रास झाल्याने संताप व्यक्त होत असून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वालधुनी नदीतील दर्पमुळे नागरिक त्रस्त असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सविता तोरणे-रगडे, गजानन शेळके व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केली. तसेच नदी किनारी रात्रीची गस्त घातल्यास टँकरने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर वचक बसणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी पात्रात केमिकल सोडणाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.