- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी कल्याण सीमेवर असलेल्या कोनगाव खाडीत डेझर व सेक्शन पंपद्वारे रेती माफिया राज रोजरोसपणे अनधिकृत रेती उत्खनन करतात . मात्र संबंधित यंत्रणेसह महसूल विभाग या गंभीर बाबीकडे पुरता दुर्लक्ष करत असून कोनगाव खाडीतून अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी कोनगावचे दक्ष नागरिक सागर म्हात्रे यांनी वारंवार महसूल विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र आपल्या निवेदनांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असून कोनगाव खाडीतून आजही रेती माफियांकडून अनधिकृत रेती उत्खनन केले जात असून आपण वारंवार करत असलेल्या तक्रारींमुळे रेती माफियांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी पोलीस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
कोनगाव येथील खाडीत बंदी असतानाही रेती माफियांनी सक्शन पंप व डेझरच्या साहाय्याने रेती उत्खनन केले आहे. त्यामुळे खाडीपात्र नाहीसे होत असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल देखील बुडत असल्याची बाबा सागर म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे . मात्र आपण भिवंडी तसेच कल्याण महसूल विभागाकडे वारंवार यासंदर्भात लेखी तक्रार व निवेदने देऊनदेखील प्रशासन रेती माफियांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे.
२ ऑगस्ट १९८७ रोजी कल्याण- भिवंडी-ठाणे खाडीपट्टा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीक्षेत्र म्हणून घोषित केला आहे मात्र तरी देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती माफियांकडून रेती उत्तखनन केली जात आहे . भिवंडीतील कोनगाव ,गोवे,पिंपळास, वेहळे, भरोडी, अंजुर,आलिमघर या बंदीक्षेत्र खाडीपट्टयात सक्शन पंपांच्या साहाय्याने उत्खनन केलेली रेती थेट कल्याण बंदरावर उतरविली जाते. वारंवार अनधिकृत रेती उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठया प्रमाणात -हास होत असून स्थानिक भूमिपुत्रांच्या सुपिक जमिनी क्षारयुक्त व नापिक होत आहेत तर विहिरींचे पाणी देखील खारे होत असून शेतकरी देशोधडीला लागण्याची चिंता म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे .
मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत रेती उत्तखनन करणाऱ्या रेती माफियांविरोधात माझा लढा सुरु असून माझे वडील स्वातंत्र्य सेनानी श्रमवीर स्व.नामदेवराव म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १९९० - ९५ च्या कल्याण- भिवंडी खाडीतील ड्रेझर हटाव आंदोलन करण्यात आले होते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण देखील अनधिकृत रेती उत्तखनन करणाऱ्या रेती माफियांविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सागर म्हात्रे यांनी दिला आहे .