उल्हासनगर : भाजप नगरसेवकाला मारहाण करणाऱ्याचा शिवसेना नेत्यांकडून सत्कार झाल्याच्या निषेधार्थ भाजपने पोलीस उपायुक्त कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून सत्कार करणाऱ्यावर कारवाईची मागणी आमदार कुमार आयलानी यांनी केली. तर मोर्चामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने पाेलिसांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेविराेधात भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी हे वारंवार सोशल मीडियावर पोस्ट टाकत हाेते. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविराेधातील वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी तीव्र आंदाेलन केले़ त्यावेळी रामचंदानी यांच्याविराेधातील राग उफाळून येऊन त्यांना मारहाण झाली हाेती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सुटका झालेल्या शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांच्या हस्ते सत्कार केला हाेता. त्याविराेधात भाजपने थेट पाेलीस उपायुक्त कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून आरोपींचा सत्कार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करून लेखी निवेदन दिले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते उपस्थित नसल्याने, भाजप शिष्टमंडळातील आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी आदींनी नाराजी व्यक्त केली. तसेच, निवेदन देण्यासाठी आलाे हाेताे, मोर्चा काढल्याचा त्यांनी इन्कार केला. पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर झालेली गर्दी उत्स्फूर्त असल्याचे आमदार म्हणाले.
चौकात
मोर्चा काढणाऱ्यावर गुन्हा?
भाजपच्या मोर्चात शेकडो जण सहभागी झाल्याने मोर्चा वादात सापडला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. मोर्चावर गुन्हे दाखल झाले तर, व्हीटीसी मैदानात झालेल्या कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केली.