मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असतानाच अनेक बेजबाबदार नागरिक व काही नगरसेवक कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करीत नाहीत. आता पोलीस व महापालिकेने संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा काही नवे निर्बंध लागू केले आहेत; परंतु बेजबाबदार लोकांवर कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल निर्देशांचे पालन करणाऱ्या नागरिकांनी केला आहे .
शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे, गर्दी टाळणे, आदी निर्देशांचे पालनच केले जात नाही . शहरातच नव्हे तर अगदी पालिका मुख्यालयातही मास्क न घालणारे वा अर्धवट घालणारे नगरसेवक, राजकीय पदाधिकारी मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करत नाहीत.
पोलीस व महापालिकेने रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान जमावबंदी लागू केली आहे. १५ एप्रिलपर्यंत शहरात मनाई आदेश लागू आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. या कालावधीत विनाकारण फिरणारे किंवा दुकाने, हॉटेल, बार खुले ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे .
शहरातील आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. महापालिकेची उद्याने, मैदाने केवळ सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यानच खुली राहणार आहेत. पालिका कार्यालयांमध्ये केवळ लोकप्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांना प्रवेश बंद केला असून, ज्यांना बैठकीसाठी बोलावले आहे, त्यांना विशेष पास दिला जाणार आहे.
मास्क सक्तीचा करण्यात आला असून, मास्क न घालणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसुली केली जाणार आहे. शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी मास्क व शारीरिक तापमान तपासणे गरजेचे केले आहे.
.........