कसारा : येथील दक्ष बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्यावरील अत्याचारांचे फोटो काढणाऱ्या व ते व्हॉट्सअॅपवर पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कसारा ग्रामस्थांकडून होत आहे.एकीकडे एक चिमुरडा नरकयातना भोगत असल्याने ही घटना जवळच्या पोलीस ठाण्यात कळविणे बंधनकारक असताना तसे न करता केवळ मोबाइलचित्रण करून या महाभागांकडून दक्षवर होणाऱ्या अत्याचारांवर समर्थन देण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याच्यावर होत असलेल्या अत्याचारांबाबत नातेवाईक व आसपासचे रहिवासी गप्प का होते, असा सवाल उपस्थित झाला असून जर त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारांबाबत संबंधित पोलिसांना माहिती दिली असती तर आज दक्ष बेपत्ता होण्यापासून वाचला असता. एकीकडे दक्षवर त्याच्या सावत्र आईकडून व सख्ख्या बापाकडून होणाऱ्या अत्याचारांचे मोबाइल चित्रण करणारे लताचे नातेवाईक व इतर रहिवासी गम्मत पाहत होते, तर दुसरीकडे तो मदतीची अपेक्षा करीत एखाद्या देवदूताची वाट पाहत अत्याचार सहन करीत बसला असावा. ‘पास्को’ कायद्याखाली होऊ शकते अटकबेपत्ता झाल्यानंतर ज्यांनी त्याचे अत्याचारित फोटो प्रसिद्धिमाध्यमे, पोलीस ठाणे, व्हॉट्सअॅपवर प्रसारित केले, त्याच्यावर अत्याचार होत असताना त्याचे फोटो काढून या अत्याचाराची माहिती पोलिसांना न देणाऱ्या या महाभागांवर पास्को कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी कसाऱ्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. जून २०१२ मध्ये पास्को हा नवा कायदा अमलात आला आहे. लहान मुलांवर अत्याचार, छळ होत असताना ते डोळ्यांनी बघत असतानादेखील ती माहिती वेळीच पोलिसांना न कळविल्याप्रकरणी त्या व्यक्तीला पास्को कायद्याखाली अटक करण्यात येऊ शकते. त्या कलमान्वये अत्याचारित, पीडित दक्षचे मोबाइल फोटो काढणाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.(वार्ताहर)
बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By admin | Published: July 20, 2015 3:17 AM