ठाणे : वाल्मिकी समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (बबिता) हिच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन वाल्मिकी सेलचे अध्यक्ष महेश घारू यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याकडे दिले आहे. मुनमुन हिच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’फेम मुनमुन ही एक सिने तसेच नाट्यअभिनेत्री आहे. तिने चित्रित केलेला एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने वाल्मिकी समाजाचा जातीवाचक उल्लेख करून वाल्मिकी समाज हा गलिच्छ असल्याचे अधोरेखित केले आहे. तिने तिच्या संवादातून विशिष्ट समाजाला गलिच्छ ही संज्ञा लावली आहे. एखाद्या उच्चशिक्षित महिलेने अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अनुसूचित जातींमधील एका वर्गाला घाणेरडे संबोधून त्यांचा अवमान केला आहे. हा प्रकार भारतीय दंड विधानाच्या १५३ अ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ च्या सुधारित २०१५ या कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा ठरतो. त्यामुळे मुनमुन हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी घारू यांनी केली आहे.
दरम्यान, मुनमुनवर गुन्हा दाखल न केल्यास आगामी आठ दिवसांमध्ये रिपाइं एकतावादीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. तिचे ज्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे, तिथे जाऊन तिच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशाराही घारू यांनी दिला आहे.