अंबरनाथ : भाजपच्या कोअर कमिटीच्या वतीने अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर दावा केला गेल्याने त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनाही आक्रमक झाली आहे. शिवसेना शहरप्रमुखांनी भाजपला टोला लगावत शिवसेनेच्या ताकदीला आव्हान न देण्याचा सल्ला दिला. तसेच या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व असून यापुढेही सेनेचे वर्चस्व राहील, असा टोला लगावला.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीने पत्रकार परिषद घेत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. पूर्वीपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते, असे मत यावेळी भाजपने व्यक्त केले.तसेच गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार हा मोजक्याच मतांच्या फरकाने पराभूत झाला होता. भाजपची ताकद शहरात वाढली असून त्या ताकदीचा विचार करत पक्षाने अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपला घ्यावा, अशी मागणी केली.या मागणीनंतर शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाले आहेत. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी भाजपच्या मागणीवर बोलताना स्पष्ट केले की, भाजपला मतदारसंघाची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, ताकदीच्या जीवावर मतदारसंघ द्यावा, ही मागणी चुकीची आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेची ताकद ही एकहाती आहे. शिवसेनेच्या ताकदीला आव्हान कोणी देऊ नये, असेही वाळेकर म्हणाले.या मतदारसंघावर माजी मंत्री साबीर शेख यांच्यापासून आजपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ केवळ शिवसेनेचा असून यापुढेही हा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील, असा विश्वास व्यक्त केला.तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी कालपरवा भाजपमध्ये आलेल्या व्यक्तींसाठी एवढा आटापिटा करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या मागणीनंतर शिवसेनेकडून उत्तर आल्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले असले तरी निवडणूक चांगलीच रंगण्याची शक्यता आहे.
भाजपच्या मतदारसंघाची मागणी; शिवसेना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 1:12 AM