मीरा रोड - भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याची मागणी चालवली आहे.कोळी जमात संस्थेचे पाटील कलमेत गौरया व त्यांच्या सहकारयांनी या बाबतचा एक तक्ता बनवला आहे. जमातीने तयार केलेल्या तक्त्या नुसार उत्तन ते चौक किनारपट्टी वर मच्छीमारांच्या २२५ मोठ्या बोटी , ३७० जाळीवाल्या बोटी तर २५५ लहान बोटी अशा मिळुन एकुण ८५० मासेमारी बोटी आहेत.मोठ्या २२५ बोटीं पैकी दिवसाला दिडशे बोटी मासळी घेऊन आल्या तर एक बोट सुमारे १० टन मासळी आणते. दिडशे बोटीं नुसार दिवसाला दीड हजार टन मासळी येते . त्यातील १२५ टन मासळी विक्री साठी तर ११०० टन सुकवण्यासाठी जाते. तर २७५ टन मासळी ही जेवणा साठी, खतासाठी , भेट म्हणुन वापरली जाते. त्यात खराब मासळी देखील असते.जाळीवाल्या ३७० बोटीं पैकी १२५ बोटी दिवसाला मासळी घेऊन आल्या तर प्रती बोट टन प्रमाणे १२५ टन मासळी येते. त्यातील ११८ टन विक्री साठी तर ७ टन मासळी जेवणासाठी, भेट आदी साठी वापरली जाते. २५५ लहान बोटीं पैकी दिवसाला २०० बोटी मासळी घेऊन आल्या तर प्रती बोट ५०० किलो मासळी नुसार १०० टन मासळी येते. त्यातील २० टन मासळी बाहेर विक्रीसाठी तर ७० टन मासळी सुकवली जाते. शिवाय १० टन मासळी ही जेवणासाठी, खतासाठी वापरली जाते.म्हणण्या नुसार एकुण आलेल्या रोजच्या १७०० टन ओली मासळी पैकी ११७० टन मासळी सुकवली जाते. २६३ टन मासळी विक्री साठी नेली जाते. तर उरलेल्या २६७ टन मासळी पैकी २१० टन मासळी खता साठी ; ५७ टन मासळी खाण्यासाठीतर ५ टन मासळीची आतडी, कुजलेली मासळी वा भाग आदी किनारयावर किंवा अन्यत्र फेकला जातो.किनारयावर टाकलेला हा मासळीचा कचरा जर भरतीच्या पाण्याने वाहुन गेला नाही तर किनारयावर पदुन कुजतो व त्यात किडे पडतात. दुर्गंधी पसरते असे हॅन्ड्री गंडोली यांनी सांगीतले. सदर ५ टन मासळीच्या कचरया प्रश्नी महापालिकेने लक्ष देऊन त्याची विल्हेवाट लावावी या साठी आम्ही आयुक्तांना भेटणार होतो. सभागृह नेते रोहिदास पाटील देखील सोबत होते. पण त्यांना अचानक जावे लागल्याने आमची आयुक्तां सोबतची भेट होऊ शकली नाही असे गंडोली यांनी सांगीतले. आम्ही पुन्हा आयुक्तांची वेळ घेऊन या मासळीच्या कचरया बद्दल बोलणार आहोत असे ते म्हणाले.मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले की, मासळीचा कुठलाही भाग मच्छीमार वाया जाऊ देत नाही. पावसाळ्यात मासळीच्या कचरयाचा थोडाफार प्रश्न निर्माण होतो. पालिकेने व शासनाने मच्छीमारांना मासळी सुकवण्यासाठी जागा उपलबध्द करुन द्यावी. त्याच सोबत टाकाऊ मासळी वा त्याचा भाग सुकवण्यासाठी जागा दिल्यास चांगलं कुटा खत जास्त प्रमाणात तयार करता येईल. पालिकेने सदरचे खत खरेदी करावे अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.
उत्तन भागात निर्माण होणाऱ्या मत्स्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 5:04 PM