कल्याण : कल्याण-डोंबिवलीत लसीकरणासाठी सामान्य नागरिकांना कसरत करावी लागते. त्यामुळे शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याची मागणी राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी गुरुवारी (दि. २९) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले.
यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी वंडार पाटील, दत्ता वडो, सुरेश जोशी, अजरून नायर, संदीप देसाई, आदी उपस्थित होते. फिरते लसीकरण केंद्र नागरिकांना उपयुक्त ठरत आहे. ते वाढविण्याची मागणी शिंदे यांनी केली. कोरोनामुळे सामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शनिवार, रविवारची दुकानबंदी शिथिल करण्यात यावी. शहरातील बीएसयूपी घरकुल प्रकल्पातील लाभार्र्थ्यांना घरे दिली जावीत. त्याचप्रमाणे रस्ते प्रकल्पातील बाधितांचे या घरकुल प्रकल्पात पुनर्वसन करावे, ही मागणी प्रलंबित असल्याकडे शिंदे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. याशिवाय २७ गावांपैकी १८ गावे वेगळी करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. जोपर्यंत हा निकाल लागत नाही, तोपर्यंत या गावातील नागरिकांना महापालिकेने सोयीसुविधा पुरविल्या पाहिजेत, अशीही मागणी शिंदे यांनी यावेळी केली.
--------------------------