अंबरनाथ : अंबरनाथमधील सूर्योदय सोसायटीतील प्लॉटधारकांना राज्य सरकारने शर्तभंग प्रकरणात दंडात्मक रक्कम भरून प्लॉट अधिकृत करण्याची मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपली असून आणखी दोन वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
सूर्योदय सोसायटीच्या शर्तभंग प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत १३ एप्रिल २०१७ रोजी आदेश दिले होते. त्यानुसार सूर्योदय सोसायटीतील प्लॉटधारकांनी जे शर्तभंग केले आहेत त्या प्रकरणी दंडात्मक रक्कम भरून नियमित करून घेण्याची मुदत दिली होती. एप्रिल २०१७ रोजी हे आदेश दिले होते. त्या दिवसापासून पुढील तीन वर्षांपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. १२ एप्रिल २०२० रोजी ही मुदत संपली असून त्याच काळात कोविडचा प्रभाव वाढल्याने अनेकांना शर्तभंगची रक्कम भरता आलेली नाही. त्यामुळे अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले असून, या निवेदनाद्वारे सूर्योदय सोसायटीच्या शर्तभंगची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.