ठाणे : ठाणे शहरातील लसीकरणाच्या वेळेचे स्लॉट बूक करण्याच्या प्रकारात हॅकिंगसारख्या गैरप्रकाराची शक्यता लक्षात घेऊन याप्रकरणी सायबर पोलिसांकडून चौकशी करावी. याशिवाय संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेने झोपडपट्टीतील काही लसीकरण केंद्रे वगळता संपूर्ण केंद्रांसाठी ऑनलाईन नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही दिवसांपासून अवघ्या काही सेकंदातच स्लॉट बुक होत आहेत. या प्रकारात हॅकिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एकाच वेळी ग्रुप बुकिंग होत असल्याचाही संशय आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिकेने सायबर सेलकडे तक्रार करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर एकाच वेळी ग्रुप बुकिंग करणारे आयपी ॲड्रेस, तसेच फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून गुन्हेगारांना गजाआड करावे. त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आता डुंबरे यांनी लाऊन धरली आहे. या कारवाईत महापालिका प्रशासनाने सामान्यांचे हित ध्यानात घ्यावे, असे आवाहन यांनी केले आहे.