मीरारोड - मराठीचे झेंडे फडकवू नका, हिंदी राष्ट्रभाषा आहे असं सांगत मराठी राजभाषेचा अपामान करत अगदी शिव्यांचा वापर केल्याबद्दल दुरचित्रवाहिनी मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार मराठी एकीकरण समितीने काशिमीरा पोलीस ठाण्यात दिली आहे.केतकी हिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला असून त्यात तिने हिंदी आणि इंग्रजी भाषेत व्हिडिओ असेल व हिंदी राष्ट्रभाषा असून, मराठीचे झेंडे फडकवू नका, असे म्हटले होते. त्यावरुन सोशल मिडीयावर खडाजंगी सुरु आहे. केतकी हिने मराठी राजभाषेचा अपमान करत मराठी माणसांच्या भावना दुखावल्या. हिंदी राष्ट्रभाषा असल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. इतकेच काय तर सोशल मीडीयावर शिव्या व शिवराळ अपशब्द वापरल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत आदींनी केला आहे.एकिकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना भेटून तक्रार दिली आहे. प्रसिध्दीसाठी हपापलेल्या केतकी चितळेने मराठी भाषेचा अपमान केल्याने तिचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे, असे सांगत तिच्यावर विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मराठी द्वेष्ट्या केतकीची कुठलीही मालिका आदी पाहू नका. तिला अनफ्रेण्ड व अनफॉलो करा असं आवाहन समितीने केलं आहे.
केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 11:14 PM