लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - मीरा भाईंदर शहराची मेट्रो मुर्धा . राई व मोरवा गावाच्या मागून डोंगरी गावा पर्यंत न्यावी आणि कारशेडच्या सरकारी जागेतील तसेच त्या मार्गात बाधित खाजगी जमिनीच्या मालकांना समृद्धी महामार्गच्या धर्तीवर मोबदला देण्याची मागणी एमएमआरडीएच्या आयुक्तांकडे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आली आहे .
डोंगरी गावच्या ग्रामस्थांनी नुकतीच आ . सरनाईक यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन दिले होते . त्या अनुषंगाने एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्या कडे झालेल्या बैठकीस आ . सरनाईक सह माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर , डोंगरी गाव प्रमुख हेरल बोर्जिस, भूमिपुत्र समन्वय संस्थेचे अशोक पाटील, संजय पलांडे आदी उपस्थित होते.
मीरा भाईंदर मेट्रो हि राई, मुर्धा, मोर्वा गावाच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या १८ मीटरचा रस्ता हा ३० मीटर करून त्यावरून पुढे न्यावी. गावच्या मागील बाजूने मेट्रो नेल्यास कोणीही विस्थापित होणार नाही. डोंगरी येथे मेट्रो कारशेडचे आरक्षण सरकारी जमिनीवर टाकले असले तरी त्या जागेत ५० ते ६० कुटुंब अनेक वर्षा पासून राहतात. त्यांचे योग्य पुनर्वसन करावे . सदर जागेत फातिमा माउलीचे सुमारे ४०० वर्ष जुने चर्च असून ती ६४ गुंठे जमीन चर्चच्या ताब्यात देण्यात यावी. मेट्रो मार्गाच्या कामात बाधित जमिनींच्या मालकांना समृद्धी महामार्गच्या धर्तीवर मोबदला देण्याची मागणी यावेळी एमएमआरडीए आयुक्तां कडे करण्यात आली . आ . सरनाईक व ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून तर याबाबत लवकरात लवकर सर्वेक्षण करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे राजू भोईर यांनी सांगितले .