उल्हासनगर : नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या, असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांना दिले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांची शुक्रवारी भेट घेतली. नांदेड जिल्हयातील अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणाचा निषेध करून, त्याच्या मारेकऱ्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी, असे निवेदन शहर कार्यकारिणीच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात, शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्यासह किशोर पाटील, रमेश गायकवाड, प्रवीण माळवे, महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई उबाळे, हरीश कटले, दिवाकर खळे, तात्या बाविस्कर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आयुब शेख, निलेश देवदे, उल्हास ढगे, भारत रणदिवे, सुरेश सरकटे आदीजन उपस्थित होते.