उल्हासनगर : महापालिका रस्ते व नाल्या बांधणीवर कोट्यावधीचा खर्च करीत असतांना, गुलशननगरमधील नाल्या व रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. परिसरात रोगराई पसरण्यापूर्वी नाल्या व रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक मेनुद्दीन शेख यांनी शहर अभियंता प्रशांत साळुंके यांच्याकडे केली आहे.
उल्हासनगर महापालिका रस्ते दुरुस्ती, पुनर्बांधणी, नाले बांधणी आदिवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. तर दुसरीकडे कॅम्प नं-१, गुलशननगर परिसरातील गटारी नाले व रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांना सरळ चालता येत नाही. अनेक महिला, मुले व नागरिक पडून जखमी झाल्याची माहिती मनसेचे शहर संघटक मेनुद्दीन शेख यांनी दिली. याबाबत महापालिकेकडे निवेदन देऊनही दुर्लक्ष केले. भुयारी गटारी व नाल्या तुंबून फुटल्याने, गटार व नाल्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या दुर्गंधीने पावसाळ्यापूर्वीच परिसरात रोगराई पसरण्याची भीती मेनुद्दीन शेख यांनी व्यक्त केली. शहर स्वच्छता व आरोग्याच्या नावावर केंद्र व राज्य शासन महापालिकेला दरवर्षी कोट्यवधीचा निधी देऊनही अशी परिस्थिती आहे.
महापालिका शहरातील भिंतीं रंगवून भिंतीवर स्वच्छते विषयी मोठं-मोठे संदेश दिले जातात. प्रत्यक्षात मात्र दाट लोकवस्ती असलेल्या आणि गोर-गरिब राहत असलेल्या वस्त्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचा आरोप मनसेने केला. महापालिकांच्या अर्थसंकल्पात १५ टक्के निधी हा अल्पसंख्यांकांच्या सोयी सुविधांसाठी राखीव ठेवावा. असा शासनाचा आदेश असतांना अल्पसंख्यांक वस्ती असलेल्या ठिकाणी सुविधांचा अभाव आढळून येतो. महापालिका आयुक्तांनी शहराचे प्रशासक म्हणून खरंच शहरवाशीयांच्या निरोगी आरोग्याच्या बाबतीत गंभीर असतीलतर, हे विदारक चित्र तात्काळ बदलले पाहिजे. असे मनसेचे म्हणणे आहे. गुलशननगर परिसरातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता प्रशांत साळुंकेसाहेब यांना मनसेच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, राहुल वाकेकर, अमित फुंदे, जगदीश माने आदीजन उपस्थित होते.