मीरारोड - जागतिक शहर मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर शहराच्या सौंदर्यीकरणा साठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी महापालिकेला देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे तर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या कडे केली आहे.
आ.सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांना लेखी पत्र पाठवून मुंबई व ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये शासनाच्या माध्यमातून जसे शहर सौंदर्यीकरण करण्यात येत आहे त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर शहर सौंदर्यीकरणाची कामे करण्यासाठी ५० कोटी रूपयांचा निधी नगरविकास खात्याअंतर्गत महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.
शहराचे क्षेत्रफळ अंदाजे ७९ चौ.कि.मी. असून उत्तरेस वसई खाडी आणि दक्षिणेस जाफरी खाडी पूर्वेस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर पश्चिमेस उत्तन समुद्र किनारा आहे . शहराचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्या १५ लाखांच्या आसपास आहे . शहर हे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाने पूर्व आणि पश्चिम अश्या दोन भागात विभागलेले असून अधिकतर विकास हा पुर्व भागाचा झाला आहे . खारफुटीने व्यापलेला भाग मोठाआहे. शहरात सुमारे १७५ कि.मी. लांबीचे रस्त्यांचे जाळे विकसित करण्यात आले असून या रस्त्यांवर लहान-मोठे असे अंदाजे १७० चौक आहेत.
शासन निर्णयानुसार शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्याबाबत महानगरपालिकेने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. निधी मिळाल्यास शहर एकत्रित सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शहरातील मुख्य रस्ते व प्रवेशद्वार, दुभाजक, मुख्य चौक, मुख्य मार्गालगतची उद्याने, उड्डाणपुल, सबवे व स्कायवॉक, रेल्वे व बस स्थानक, वाहतुक बेटे, तलाव व चौपाटी आदींचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
परिसराचे थिमबेस्ड सुशोभिकरण, दिशादर्शक कमानी, दर्शन भिंतीवर सांस्कृतिक व सामाजिक रूपरेषा आधारित रंगरंगोटी, आकर्षक प्रकाश योजना , सेल्फी पॉईटस् इत्यादींचा समावेश करून शहराचे सौंदर्यीकरण होणे गरजेचे आहे असे आ. सरनाईक यांनी निवेदनात म्हटले आहे. पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी देखील ३१ मार्च रोजी नगरविकासच्या प्रधान सचिवांना शहराच्या सुशोभीकरण साठी कामांची संकल्प चित्रे , सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून ५० कोटींचा निधी मागितला आहे.