अनिरुद्ध पाटीलडहाणू - गणपती-गौरी उत्सवाकरिता फुलांना मागणी असून डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील बबन आणि विशाल हे चुरी पिता-पुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याच्या फुलांची निर्यात मुंबईच्या बाजारात करीत आहेत. त्यांच्या बागेत दोन हजार झाडे असून त्यांना महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात या शेतकऱ्यास सोन्याचे दिन आल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सन 2011 साली चुरी यांनी 1500 रोपांची लागवड, साडेपाच एकर जागेत केली होती. लागवडीनंतर दोन वर्षात उत्पन्न निघायला सुरुवात झाली. 25 ते 30 वर्षापर्यंत हे झाड उत्पन्न देते. आजतागायत झाडांची संख्या 2 हजार असून दररोर वीसहजार फुले निघतात. सध्या प्रतिशेकडा शंभर ते सव्वाशे रुपये बाजारभाव आहे. ऋतुमानानुसार फुलं निघण्याचे प्रमाण कमी अधिक असले तरी, दिवसागणिक सरासरी वीस हजार फुले, याप्रमाणे वर्षभर फुलं निघतात. दरम्यान, जमिनीची मशागत, खत, मजुरी व अन्य खर्च वगळता वर्षाला 6 ते 7 लक्ष रुपये उत्पन्न मिळत असल्याचे विशाल चुरी यांचे म्हणणे आहे."या रोपांना रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत, तसेच गांडूळ खताचा वापर केल्याने उत्पन्न चांगले व दर्जेदार निघते. कमीत-कमी रासायनिक कीटक नाशाकांचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या हंगामात इतर ठिकाणी उत्पन्न कमी असते. त्यावेळी येथे झाडं बहरलेली असतात. तर ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी व खत व्यवस्थापन करता येते, असे शेतकरी बबन चुरी यांनी म्हटले आहे.