कल्याण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात १० हजार मतदार ओळखपत्रे फेकून दिल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने कल्याण तहसीलदार व पोलिसांकडे केली आहे.
कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला आघाडीच्या कांचन कुलकर्णी, पदाधिकारी अमित म्हात्रे, योगेश कुलकर्णी, राहुल काटकर, अमोल पवार, लता जाधव, उज्ज्वला पाटील, शकील खान, पॉली जेकब यांनी शुक्रवारी तहसीलदार अमित सानप यांची भेट घेतली.पोटे म्हणाले की, बाजार समितीच्या आवारातील कचऱ्यात ही मतदार ओळखपत्रे आढळली. काही ओळखपत्रे जाळलेली होती.
२००७ मधील ही ओळखपत्रे असल्याने ती तेथे कोणी टाकली, जाळण्याचा उद्देश काय? मुस्लिम व दलित मतदारांची ही ओळखपत्रे असून ते काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्यांनी मतदान करू नये, यासाठी व काँग्रेसचा पराभव करण्याच्या हेतूने हे काम कोणी केले, याची चौकशी करावी, दोषींवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नॅशनल बॅकवर्ड क्लास एज्युकेशनल अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या प्रमुख रीना खांडेकर, संगीता भोईर, नीलिमा पाटील, रेखा ठोसर, संगीता चौधरी, भालचंद्र बर्वे यांनीही चौकशीची मागणी केली आहे.