भातसानगर : शहापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांना उपचारासाठी भिवंडी येथे जावे लागत असल्याने शहापूरमध्ये कोविड सेंटर व क्वाॅरंटाइन सेंटर तयार करण्याची मागणी शहापूर तालुक्यातील नागरिक करत आहेत.
तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी थेट भिवंडी गाठावे लागत असल्याने रुग्णांना मानसिक त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांवर तालुक्यातच उपचार मिळण्यासाठी कोविड सेंटर व क्वाॅरंटाइन सेंटरची मागणी होत आहे.
सध्या तालुक्यात आरोग्य केंद्रात तालुक्यातील रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, या महामारीवर मात करण्यासाठी तालुक्यामध्ये क्वाॅरंटाइन सेंटरची मागणी होत आहे. शहापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत एकूण तीन हजार ५८४ रुग्ण आढळले आहेत, तर शनिवारी तीन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर आतापर्यंत १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहापूर नगरपंचायतीमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील नऊ उपकेंद्रांमध्ये केवळ ॲन्टिजेन तपासणी केली जाते, तर यामध्ये अधिक प्रमाणात लक्षणे आढल्यास त्याला उपजिल्हा रुग्णालयात पाठवून नंतर भिवंडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविले जाते. यामुळे बराच वेळ व वाहनांची जमवाजमव यामुळे अडचणी येत असल्याने अशा रुग्णांना उपचारासाठी तालुक्यातच सोय व्हावी म्हणून कोविड सेंटरची मागणी होत आहे. दरम्यान, तालुक्यात कोरोना सेंटर व क्वाॅरंटाइन सेंटर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके यांनी सांगितले.