सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे नालीचे पाणी नालंदा शाळेच्या पटांगणात जमा झाल्याने, शिक्षक व स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरले. नालीचे दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक व समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी महापालिकेकडे केली.
उल्हासनगरात सर्रासपणे निकृष्ट कामे होत असल्याने, महापालिका कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. कॅम्प नं-४ दहाचाळ येथील नालंदा शाळे जवळील रस्त्याची नाली निकृष्ट कामामुळे खराब होऊन, नालीतील पाणी शाळेच्या प्रांगणात आले. नालीच्या पाण्याचा त्रास येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह शिक्षकांना होत आहे. शाळा बंद असल्याने, मुले शाळेत येत नाही. शाळा सुरू होण्यापूर्वी नालीचे बांधकाम करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. तर समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी महापालिकेला याबाबत निवेदन देऊन नालीचे काम करण्याची मागणी केली. यापूर्वी महापालिका प्रभाग क्रं-७ येथील नाली व रस्त्याचे निकृष्ट काम मनसेचे प्रवीण माळवे यांनी उघड केले होते.
महापालिका अभियंता संदीप जाधव यांनी याबाबतची दखल घेऊन, निकृष्ट बांधकाम प्रकरणी ठेकेदाराला नोटीस देऊन पुन्हा काम करण्याचे सुचविले. तसेच काम न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्याने, अभियंता संदीप जाधव यांचे सर्वस्तरातून कौतुक झाले. मात्र मराठा सेक्शन बाल शिवाजी- जिजामाता गार्डन समोरील रस्ता बांधणीच्या नावाखाली सिमेंट काँक्रिट रस्त्यावर सिमेंट रस्ता बांधण्यात आला. रस्त्यावर स्थानिक रस्त्यावर टीका होऊनही काहीएक कारवाई झाली नाही. असे अनेक ठिकाणचे निकृष्ट काम झाल्याने, महापालिका कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हे उभे ठाकले. एका आठवड्यात नालीचे काम न झाल्यास, आंदोलन करावे लागेल. असी प्रतिक्रिया समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी दिली.