लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या सात कोविड रुग्णालयांमधील रुग्णांसाठी दिवसाला ४०० रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असताना, मात्र मनपाला केवळ १०० इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या १४ हजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्यांपैकी ७५ टक्के रुग्ण हे कोविडचे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना टाटा आमंत्रा येथील कोविड केंद्रात पाठविले जाते. मात्र, गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनी ‘रेमडेसिविर’ची आवश्यकता लागते. मनपाने यापूर्वी पुरेशी रेमडेसिविर इंजेक्शन मागवली होती. मात्र, आताची वाढती रुग्णसंख्या पाहता, या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. पुरेशी इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने मनपा प्रशासनही हतबल झाले आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोनाचा आढावा घेतला असताना, मनपा आयुक्तांनी ३० हजार इंजेक्शनचा पुरवठा कंत्राटदाराकडून मनपास उपलब्ध होईल, अशी तजवीज केली आहे. ही इंजेक्शन उपलब्ध होताच मनपा रुग्णालयात पुरेशी इंजेक्शन उपलब्ध होतील. तेव्हा हा ताण कमी होईल, असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, रेमडेसिविर पुरवठादाराकडून उपलब्ध होऊ शकते. मात्र, टोझलीझुमॅब इंजेक्शन तर बाजारातच उपलब्ध नाही. २७ एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, ते अद्याप उपलब्ध झालेले नाही.
इंजेक्शन बाहेरून आणण्याची वेळ
मनपा हद्दीतील ९० खासगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांनाही रेमडेसिविर आणि टोझलीझुमॅबची गरज भासत आहे. त्यापैकी ‘रेमडेसिविर’ हे जिल्हाधिकारी नियंत्रण समितीकडून उपलब्ध करून दिले जाते. मात्र, खासगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ते बाहेरून आणण्यास सांगितले जाते, परंतु ते बाजारात मिळत नाही. नियंत्रण समितीकडूनही अत्यावश्यक बाब म्हणून दुसऱ्या दिवशी हे इंजेक्शन दिले जाते. दरम्यानच्या काळात रुग्णांची प्रकृती खालावल्यास त्यांचा प्राण जाऊ शकतो, अशी भीती त्यांच्या नातेवाइकांना सतावते.
------------------------