कल्याण : औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत दोन कंपन्या जळाल्यानंतर राजकीय नेत्यांनी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) शहरापासून दूर हटवण्याची आणि रासायनिक कंपन्यांची तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने त्याचा अहवाल आल्यावरच संबंधितांवर गुन्हे दाखल करू आणि कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.अल्ट्रा प्युअर केम कंपनीला आणि जागृती केमिकलला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे अधिकारी, आग नियंत्रण तज्ज्ञांकडून त्यांचा अहवाल येईल. त्यात आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होईल. त्यानंतर, संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करू, असे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी सांगितले.चौकशी करून कारवाई : रवींद्रनया आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजलेले नाही. ती का लागली, याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सांगितले.प्रदूषण विभागाची चौकशी करा !औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही. मुळात, या गंभीर गोष्टींवर त्यांचे नियंत्रण नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा याला जबाबदार असल्याचा ठपका ठेवून त्यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यातील दोषींवरही कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.कंपन्याच हटवा : या आगीमुळे प्रश्न नेहमी पडतो की, या कंपन्यांना मार्च महिन्यातच आग कशी काय लागते? तसेच अधिकृत नागरी वस्त्यांना खेटून असलेल्या, सर्व नियमांचा भंग करून व प्रदूषण करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या रासायनिक कंपन्या धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य सरकारने इतरत्र हलवाव्या, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी केली. यातून काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, हे मान्य आहे. पण, नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाचा विचार केला, तर त्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे, असेही त्यांनी सुचविले.तपासणीच नाही : म्हात्रेऔद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्यांमध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर कधीच येऊन तपासणी करत नाहीत. बहुतांश कंपन्यांत टेक्निशियन नाही. त्यामुळे कंपन्यांत कामगारांच्या जीवाशी खेळण्याचे काम येथील सर्वच मोठ्या रासायनिक कंपन्यांत सुरू आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ग्रामीणचे नेते प्रकाश म्हात्रे यांनी केला.
एमआयडीसीच हटवण्याची मागणी!
By admin | Published: March 06, 2016 1:55 AM