उल्हासनगर : शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी कॅम्प नं-५ खडी मशीन येथिल डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार यांच्याकडे आज निवेदन दिले. तर दुसरीकडे भाजपा नगरसेवकांनी ३ सप्टेंबर रोजी डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा दिल्याने शिवसेना व भाजप आमने सामने आल्याचे चित्र आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ मधिल खडी खदान येथे ४ वर्षा पूर्वी डंपिंग ग्राउंड सुरू केले. डंपिंग ग्राऊंडवरील दुर्गंधी व उन्हाळ्यात लागलेल्या आगीच्या धुरामुळे गायकवाड पाडा, सेक्शन ३६, प्रेमनगर टेकडी आदी परिसरातील हजारो नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी वेळोवेळी डंपिंग ग्राउंडला विरोध करून मोर्चा, ठिय्या आंदोलन, कचऱ्याच्या गाड्या अडविणे, महापालिकेत स्थानिक नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन केल्यावर पर्यायी जागा मिळाल्यानंतर डंपिंग हटवण्याचे संकेत त्या त्यावेळी महापालिकेने दिले होते. दरम्यान महापालिका तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी राज्य शासनाकडे डंपिंग ग्राउंड साठी पाठपुरावा केल्या नंतर उसा टणे गावा जवळील एमएमआरडीए च्या ताब्यातील ३० जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी देण्याला तात्विक मंजुरी दिली. मात्र अद्याप पर्यंत जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली नाही.
दरम्यान डंपिंग ग्राऊंडवरील दुर्गंधीतुन स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला असून ३ सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याचा लेखी इशारा दिला. उपोषणाला शेकडो नागरिक व अनेक नगरसेवकांनी पाठिंबा देवून डंपिंग ग्राउंड इतरत्र हलविण्याची मागणी केली. दरम्यान शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांनीही डंपिंग हटवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून उसाटणे गाव येथील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा निःशुल्क महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी केली. मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार यांच्याकडे आमदार किणीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना - भाजप आमने सामने-
महापालिका सत्तेत असलेल्या शिवसेनेला डंपिंग ग्राउंड प्रकरणी कोंडीत पकडण्यासाठी भाजपने डंपिंग ग्राउंड हटावची मागणी करून ३ सप्टेंबर पासून उपोषणाचा इशारा दिला. तर उपोषणाला बसण्यापूर्वी उसाटणे गाव हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी प्रयत्न सुरू केले आहे. एकूणच डंपिंग वरून शिवसेना भाजप आमने सामने आल्याचे चित्र शहरात आहे.