भिवंडी - स्वातंत्र्यपूर्व काळापासून भिवंडी तालुक्यातील सरवली गावाच्या सार्वजनिक वापरासाठी शासकीय जमिनी संबंधित ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या होत्या. गावाच्या विविध विकासकामांसाठी या जमिनी आरक्षित केलेल्या आहेत.
तालुक्यातील सरवली ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या सर्व्हे नं. ९० (ब ) या शासकीय गुरचरण जागेवर अलीकडच्या काळात सार्वजनिक जमिनीचा वापर अनधिकृतरीत्या काही कंपन्या करीत असल्याचा आरोप मनविसेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी केला आहे. सरवली ग्रामपंचायत क्षेत्र सध्या एमआयडीसी क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मूलभूत गरजा व गुरचरणासाठी अशा जमिनीची दिवसेंदिवस कमतरता भासू लागली आहे. गावाच्या आजूबाजूला ज्या पद्धतीने शासकीय प्रोजेक्ट लादले जात आहेत, त्या अनुषंगाने ही गुरचरण जागा खूप मोठी असल्याने एमएमआरडीए किंवा अन्य शासकीय संस्था त्याचा ताबा घेऊ शकतात, म्हणून या जागेचा भविष्यात गावाच्या विकासासाठी योग्य पद्धतीने वापर होणे गरजेचे असल्याचे मत चौधरी यांनी व्यक्त केले. गावाच्या मूलभूत सोयीसुविधा उदा. पाणीपुरवठा, दवाखाना, शाळा, केंद्र व राज्य पुरस्कृत योजना तथा सौरऊर्जा प्रकल्पासाठी ही जागा मिळावी, यासाठी मनविसे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
मनसेने केलेल्या विधायक मागणीस लगेचच मासिक सभेत मांडण्यात येईल, अशी माहिती सरवलीच्या सरपंच संध्या चौधरी यांनी दिली आहे.