उल्हासनगर : महापालिका महासभेत मला मराठी येत नाही, हिंदी अथवा सिंधीत बोला, असे सुनावणाऱ्या महापौर पंचम कलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याची मागणी मनसेने केली. मराठी शिकण्यासाठी मराठीचे बाराखडी पुस्तक सप्रेम भेट मनसेकडून देण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिका महासभेत पाणी प्रश्नी बहुतांश नगरसेवक आक्रमक झाले होते. भाजपाचे नगरसेवक विजय पाटील पाणीप्रश्नी पोटतिडकीने बोलत होते. त्यांनी मराठीसह हिंदी व सिंधी भाषेत सांगितल्यावर पुन्हा मराठीत बोलू लागले. तेव्हा महापौर पंचम कलानी यांनी मला मराठी येत नाही, सिंधी अथवा हिंदीत बोला, असे सुनावले. त्यावेळी पाटील पुन्हा आक्रमक होत बोलू लागले.महापौरांनी भर महासभेत मराठी येत नसल्याचे सांगत मराठी भाषेचा अपमान केला. अश्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक मुंग गिळून गप्प कसे? आता मराठीचा अभिमान गेला कुठे? असा प्रश्न मनसेने करून महापौर पदाचा राजीनामा मागितला आहे. शहर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आपल्या पदाधिकाऱ्यासह, गेल्या शुक्रवारपासून महापालिका मुख्यालयात मराठीचे बाराखडी पुस्तक महापौरांना भेट देण्यासाठी घेऊन येत आहेत.मात्र महापौर पंचम कलानी शुक्रवारी व सोमवारी पालिकेत आल्या नसल्याने, पुस्तक भेट देण्याचा, मनसेचा कार्यक्रम बारगळला आहे. मराठी भाषेचा विषय शिक्षणात बंधनकारक असताना यांना मराठी कशी येत नाही? असा प्रश्न मनसेने उपस्थित करून महापौर कलानी यांनी नागरिकांची जाहीर माफी मागून महापौरपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. या प्रकाराने शहरात पुन्हा सिंधी व मराठी भाषावाद रंगणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उल्हासनगरात महापौरांकडून मराठीचा अपमान, मनसेकडून राजीनाम्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:27 PM