ठाणे : उन्हाळा सुरू झाला की, पोटाला गारवा देणाऱ्या मधुर अशा कलिंगडच्या खरेदीला सुरुवात होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कलिंगडच्या मागणीत चौपट वाढ झाली असल्याचे निरीक्षण फळ विक्रेत्यांनी नोंदविले. दिवसाला जिथे एक ते दोन कलिंगड खरेदी केले जात होते, तिथे आता जवळपास १५ ते २० कलिंगडांची खरेदी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाळ्यास सुरुवात झाली की आठवण येते ती गारेगार आणि थंड अशा कलिंगडची. या दिवसांत कलिंगडने संपूर्ण बाजारपेठा सजण्यास सुरुवात होते. एप्रिल-मे महिन्यात कलिंगडांच्या खरेदीला उधाण आलेले असते. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्ह वाढू लागले आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके प्रकर्षाने जाणवू लागले आहे. जसा उन्हाळा वाढू लागला तशी कलिंगडांच्या खरेदीत वाढ होऊ लागली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी ग्राहकांचे पाय कलिंगडांच्या गाड्यांकडे वळत आहेत. वाढलेल्या तपमानामुळे एकीकडे कलिंगडाला मागणी वाढली आहे, तर दुसरीकडे आवक चांगली असल्याने दरही आवाक्यात आहेत. उकाड्यावर गार कलिंगडाचा गोडवा उपयुक्त ठरत आहे. त्यामुळेच कलिंगड खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. कलिंगडची मागणी वाढली असली तरी दर स्वस्त आहेत. याआधी २० ते २५ किलो कलिंगडची आवक होत असे आता ७० ते ८० रुपये किलोने खरेदी होत असल्याचे फळविक्रेते धीरज गुप्ता यांनी सांगितले. एक आठवड्याच्या आधी मागणीत थंड पडलेल्या कलिंगडला सध्या चांगला उठाव आहे. एका दुकानातून एक ते दोन कलिंगडांची खरेदी होत होती तिथे आता जवळपास १५ ते २० कलिंगडांची खरेदी होत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. कलिंगड सध्या २५ ते ३० रुपये किलोने विकले जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून कलिंगडांची आवक होत आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकवरून येणाऱ्या कलिंगडांना ग्राहकांची अधिक मागणी असल्याचेही फळविक्रेत्यांनी सांगितले.