कल्याण : कल्याणहून वसईला जाण्यासाठी रेल्वे तसेच एसटी बससेवा नसल्याने कामावर जायचे कसे, असा प्रश्न नोकरदारांना सतावत आहे. बस नसल्याने खाजगी वाहनाने कार्यालय गाठणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली असताना कल्याण एसटी डेपोतून कल्याण-वसई ही बससेवा महामंडळाने सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कल्याणहून वसईला जाणाऱ्यांसाठी दिवा-वसई रेल्वेगाडी सोयीची होती. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक सुरू केली नसल्यामुळे नोकरदार वर्गापुढे एसटी बसचा पर्याय होता. कल्याण डेपोतून नगर, धुळे, कोल्हापूर, नाशिक येथे एक ते दोन बस सोडल्या जात आहेत. मात्र, कल्याण-वसई बस अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. ओला-उबेर या खाजगी टॅक्सीचे भाडे सामान्य प्रवाशांना परवडत नाही. तसेच स्वत:ची दुचाकी घेऊन गेल्यास खड्ड्यांमुळे कल्याणहून वसई गाठण्यासाठी किमान दोन तास लागतात. नोकरी जाऊ नये या भीतीपोटी अनेक जण कल्याणहून वसईला जाण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात. मात्र, पगाराच्या तुलनेत प्रवासावरच त्यांचा खूप खर्च होत आहे.वरिष्ठांनी निर्णय घेतल्यास बससेवा होईल सुरूयासंदर्भात कल्याण एसटी बस डेपोचे व्यवस्थापक विजय गायकवाड म्हणाले, कल्याण डेपोतून वसई बस अद्याप सुरू केलेली नाही. वसईहून कल्याणला येणाºया बसची फेरी ही पालघर बस डेपोतून चालविली जाते. मात्र, त्यांनाही बस सुरू करण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाले नसल्याने बससेवा सुरू झालेली नाही. प्रवाशांची गैरसोय आम्हाला समजते. मात्र, वरिष्ठांनी निर्णय घेतल्यासच बससेवा सुरू करणे शक्य होईल.