उल्हासनगर : रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी व मर्यादित पुरवठ्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होत असून त्याला आळा घालण्याची मागणी उल्हासनगरवासीयांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
शहरातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे, महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयाची इंजेक्शनची एकूण मागणी महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय मान्यताप्राप्त मेडिकलच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणार, असे ठरले. तसेच रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना चिठ्ठी देऊन इंजेक्शनची मागणी करण्यास मनाई केली. असे असतांना सर्वच कोविड रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी देऊन सर्रास हे इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत आहेत.
मनसे अध्यक्ष बंडू देशमुख, ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे अध्यक्ष राज असोडकर, प्रहार जनशक्तीचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील, समाजसेवक शिवाजी रगडे आदींनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे मान्य करीत, राज्याला लवकरच इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. सध्या प्लाझ्मा हा कोविड रुग्ण बरे होण्यासाठी संजीवनी ठरत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकाला प्लाझ्मा आणण्यास सांगत आहेत. यातून प्लाझ्मा डोनर भेटणे हे अवघड होऊन बसल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मादान करण्याकरिता शासनाकडून जनजागृती करावी, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.