जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यावर तात्पुरता मार्ग म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. त्यामुळे तो दररोज आणि पुरेशा प्रमाणात करण्याची नागरिकांची मागणी आहे.तालुक्यातील पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या गावांमध्ये वाढ झाली असून एक गाव गेगाव आणि गायरानपाडा या दोन्ही गावांच्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. सध्या गायरानपाड्याला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, या गायरानपाड्याला दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
गेगावातही टंचाईची समस्या निर्माण झाली असून या गावाची विहीर कोरडीठाक पडल्याने याही गावाला टँकरने पाणी पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही ही मागणी मान्य झालेली नाही. ती मान्य करून दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून यावेळी करण्यात आली आहे.
सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला यंदा पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. आजूबाजूला असलेल्या गावांना कधीही पाणीटंचाई निर्माण झाली, तरी गेगाववासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नव्हता. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावाला पाणीसमस्या सहसा जाणवत नव्हती. मात्र, यंदा लवकर गेलेल्या पावसाने ही समस्या निर्माण झाली आहे. यंदा तोही वेळेवर पडेलच, याची शाश्वती नसल्याने यावर्षी अधिक प्रमाणात पाणीसमस्या निर्माण होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तो दररोज आणि पुरेसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
गायरानपाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, तो दोनतीन दिवसांऐवजी दररोज करण्यात यावा, तसेच गेगावाला तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. - रमेश हुकमाळे, सेवा सोसायटी, उपाध्यक्ष
गेगाव येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर, मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. - नथू धोंडू पानसरे
ज्या गावांना पाणीसमस्या निर्माण झाली आहे, त्यांनी ग्रामपंचायतीचे ठराव दिल्यास त्यांना टँकरने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ते ठराव मंजुरीसाठी लगेचच पाठवले जातात. - एच.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग