ठाणे : मार्च एन्ड असल्याने ठाणे महापालिकेची पाणी बिलांची वसुली जोरात सुरु आहे. मात्र या घाईत अनेक प्रभागांमध्ये चुकीच्या पध्दतीने बिले आली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाग १८ मध्ये असाच प्रकार घडल्याने त्याविरोधात विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी नुकतीच ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.ठाणे महापालिकेची सध्या चालू बिलांबरोबरच थकीत बिलांची वसुली युध्दपातळीवर सुरु आहे. या घाईत अनेक ठिकाणी चुकीची बिले जात असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. काही ठिकाणचे कनेक्शन तोडण्यात आल्यानंतरही त्या रहिवाशांना बिले पाठवल्याचा प्रकार घडला आहे. काहींना दंड, व्याज लावून बिले दिली गेली आहेत. प्रभाग क्रमांक १८ मध्ये थकीत बिले पाठवून त्याच्या वसुलीचे काम गेले काही दिवस सुरु आहे. अनेक ठिकाणी त्यासाठी नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असल्याचे फाटक यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. वागळे इस्टेट प्रभाग समितीमध्ये दोन वर्षापूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नसताना सध्या संगणकीय बिले पाठविली जात आहेत. जुनी थकीत बिले व त्यावर प्रशासकीय आकार, व्याज लावल्याने बिलाची रक्कम अवाढव्य झाली असून मध्यमवर्गीयांना याचा नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातच इमारतीचे मालक व भाडोत्री यांच्यातील वादामुळे आणिा महापालिका अधिकाऱ्यांनी अनेक इमारतीमध्ये २० खोल्या असतील तर तेथे २२ खोल्यांची बिले पाठवून त्यांच्या वसुलीचा तगादा लावल्याने बिले थकल्याचेही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. आता रहिवासी बिले भरण्यास तयार असून अतिरिक्त प्रशासकीय आकार माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आयुक्तांनीही या संदर्भात सकारात्मक निर्णय दिला असून या भागात लवकरच एक कॅम्प लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती फाटक यांनी दिली. (प्रतिनिधी)
चुकीच्या पाणीबिलांच्या चौकशीची मागणी
By admin | Published: March 16, 2017 2:54 AM