भातसानगर - कधीकाळी मोठ्या संख्येने असणाऱ्या शाडूच्या गणपतीच्या मूर्तींची मागणी कमी होत असून त्यामुळे या मुर्तीकारांना बेरोजगारीचे संकट भेडसावते आहे.सध्या बाजारात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आल्याने त्यांची मागणी वाढली आहे. त्यांच्या किमतीही शाडूच्या मूर्तीपेक्षा कमी असल्याने नागरिक त्याचीच खरेदी करतात. त्यामुळे गावागावातील शाडूच्या मूर्तीकारांच्या रोजगारावर गदा आली आहे. या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहेत. त्या विरघळत नसल्याने त्या पाण्यातही तशाच राहतात. त्यामुळे पाणी दूषित होत असूनही त्या घेण्याचा कल अधिक असल्याचे आश्चर्य वाटत असल्याचे मूर्तीकार सांगत आहेत.पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी शाडूच्या मूर्ती घेण्याबाबत अनेक वर्षांपासून जनजागृती सुरू आहे. त्यातच श्रावण महिना आला की, या मूर्तीकारांना थोडीही फुरसत नसते. दिवसरात्र एक करून ही मूर्तींची मागणी पूर्ण केली जायची. यामुळे या कारागीरांना चांगला रोजगार मिळायचा. शिवाय, या मुर्तींचा पर्यावरणाला कोणताही धोका होत नव्हता. जेथे विसर्जन केले जायचे, तेथेच त्या पाण्यात पूर्ण विरघळून जात असत.तरीही तालुक्यातील शाडूचे गणपती बनवणाºया मुर्तीकारांनी आपल्या कलेपासून बाजूला न होता त्यांनी आपली ही कला आणि शाडूच्या मूर्तींचा व्यवसाय सुरूच ठेवला आहे. माझ्या अनेक पिढ्यांनी हा व्यवसाय तसेच ही कला जोपासल्याने मी देखील ती सुरूच ठेवणार असून आजही ग्रामीण भागातील लोक शाडूच्या मूर्ती आमच्याकडून घेत असल्याचे मूर्तीकार राजेश बुधाजी दहीलकर यांनी सांगितले.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी, शहापुरातील मूर्तीकारांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:14 AM