डोंबिवली - शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी युती झाली तरी जालनामध्ये दानवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणुक लढविन या त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मौन बाळगले. रविवारी दानवे यांनी डोंबिवलीत पुर्वेकडील स वा जोशी विद्यालयाच्या पटांगणावर पार पडलेल्या असंघटीत व नाका कामगारांच्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या सोहळयाला उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी खोतकरांच्या विचारलेल्या मुद्यावर दानवे यांनी चुप्पी साधणे पसंत केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत दानवे यांना विचारणा केली असता अण्णांचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. त्यांची समजूत काढली जाईल असे ते म्हणाले.नवाब मलिकांनी अण्णांवर जे आरोप केले त्याबाबत मात्र दानवेंनी राष्ट्रवादीच्या भुमिकेवर टिका केली. अण्णांची आंदोलन केवळ आमच्याच सरकारच्या कालावधीत सुरू नाहीत तर काँग्रेसच्या सरकारमध्येही झाली. अण्णा हे जनतेचे प्रश्न मांडत असतात असे स्पष्ट करीत दानवेंनी अण्णांचे कौतुकच केले.वर्धापनदिनाच्या निमित्ताने दानवे यांनी केलेल्या भाषणात नाका कामगारांसाठीच्या योजनांबाबतची माहीती उपस्थितांना दिली. तर हे सुटाबुटातले काँग्रेसचे सरकार नाही तर तळागाळातील लोकांसाठी झटणारे माझे सरकार आहे असे म्हणत काँग्रेस सरकारच्या कार्यपध्दतीवर टिका केली. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी असंघटीत कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन केले.
राज्यमंत्री खोतकरांच्या वक्तव्यावर दानवेंचे मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:56 AM