भाईंदर - मीरारोड येथील शीतलनगर परिसरात असलेल्या कॉस्मोपॉलिटन या खाजगी शाळेने दोन विद्यार्थ्यांचे अर्धवट शिक्षण थांबवुन त्यांना शाळेतून परस्पर काढून टाकल्याने त्याविरोधात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या भार्इंदर शाखेच्या पदाधिका-यांनी बुधवारी पालिका मुख्यालयाजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी प्रशासनाकडे त्या शाळेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली.या शाळेने सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात राज्य सरकारच्या कायद्यान्वये किमान १५ टक्के वाढ करणे अपेक्षित असतानाही सुमारे ४० टक्के वाढ केली. यामुळे इयत्ता दुसरीत शिकणारा आसिफ शेख व इयत्ता चौथीच शिकणारी त्याची बहिण आयेशा यांच्या पालकांनी बेकायदेशीरपणे वाढ केलेली फी भरण्यास नकार दिला. यामुळे शाळेने त्या विद्यार्थ्यांना थकीत फी त्वरीत भरण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केले. यानंतर सहामाही परिक्षेनंतर त्यांना परस्पर शाळेतुन काढले. याविरोधात त्या विद्यार्थ्यांची आई निशाद यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्याशी संलग्न असलेल्या अनुदानित बचाव समितीच्या माध्यामातुन राज्य सरकारच्या शिक्षण उपसंचालकांकडे शाळेच्या मनमानी कारभारविरोधात १७ आॅक्टोबरला तक्रार केली. शिक्षण उपसंचालक (मुंबई विभाग) डॉ. बी. बी. चव्हाण यांनी २६ आॅक्टोबरला शाळेच्या मुख्याध्यापिका निलम पाठक यांना पत्र पाठवुन त्या विद्यार्थ्यांना त्वरीत शाळेत नियमित करुन त्याचा अहवाल ७ नोव्ह्रंबरपर्यंत विभागाला पाठविण्याचे आदेश दिले. त्याचे पालन न केल्यास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील नियम १२ नुसार कलम १२(३) व १८(३) अन्वये शाळेची मान्यताच रद्द करण्याचा इशारा दिला. परंतु, शाळेने त्याची दखल न घेता त्याला केराची टोपली दाखविली. त्याची तक्रार निशाद यांनी पुन्हा शिक्षण उपसंचालकांकडे केली असता त्यांनी १३ नोव्हेंबरला पुन्हा शाळेच्या मुख्याध्यापकांसह मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांना पत्र पाठविले. त्यात दोन दिवसांत कार्यवाहीच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. अन्यथा शाळेची मान्यताच रद्द करण्याची कार्यवाही सुरु करण्याचा इशारा देण्यात आला. त्यालाही शाळेने दाद न दिल्याने अखेर भाकपाच्या भार्इंदर शाखेचे अध्यक्ष अॅड. किशोर सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी पालिका मुख्यालयाजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन छेडले. त्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त दिपक पुजारी यांना निवदेन देऊन शाळेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली. त्यावर उपायुक्तांनी शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या अहवालात शाळेची प्राथमिक चौकशी केल्याचे स्पष्ट केले असुन शाळेची मान्यता रद्द करण्यास हरकत नसल्याचे नमुद केल्याने त्यानुसार वरीष्ठ विभागाला तसे कळविण्यात येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यानंतर ते आंदोलन मागे घेतल्याचे अॅड. सामंत यांनी सांगितले.
मीरारोडच्या कॉस्मोपॉलिटन शाळेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 6:32 PM