लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : धोकादायक कामगार रुग्णालयाच्या जागी नवीन अद्ययावत रुग्णालय उभारणीला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे, महापौर लीलाबाई अशान यांनी शुक्रवारी दिली. त्यानुसार, रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामास सुरुवात झाली आहे.
उल्हासनगर परिसरातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरात कारखान्याची संख्या मोठी असून, दीड लाखापेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. सन-१९७१ पासून उभ्या असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल व्यवस्थित न झाल्याने, काही वर्षांपासून रुग्णालय इमारतीसह व डॉक्टर व इतर कामगारांची निवासस्थाने धोकादायक झाली. त्यानंतर, रुग्णालयाच्या पुनर्बांधणीची मागणी सर्व स्तरांतून झाली. काही वर्षांपूर्वी या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आयआयटीकडून आल्यानंतर, मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागी नवीन अद्ययावत रुग्णालय उभे राहावे, यासाठी केंद्राकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करून रुग्णालयासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.
कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी १०२ कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर, २०१९ मध्ये शिंदे यांच्या हस्ते नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत असेलेले कामगार रुग्णालय स्थलांतरित करणे गरजेचे होते. त्याचा मुहूर्त निघाल्यावर कामगार रुग्णालयाची धोकादायक झालेली इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली. १०० बेडच्या या रुग्णालयाकरिता १ लाख ८० चौरस फूट क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यातील अंदाजे १ लाख २२ चौरस फूट क्षेत्र हे रुग्णालयासाठी व उर्वरित रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था असणार आहे. रुग्णालयाच्या दुमजली इमारतीत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, फार्मसी, शस्त्रक्रिया विभाग आदी अत्याधुनिक सुविधा रुग्णालय असणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांनी दिली.
...............
पुनर्बांधणीचे श्रेय शिवसेनेला
शहरातील कामगार रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून, रुग्णलयाच्या बैठकीला डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण अशान व नगरसेवक, चंद्रकांत बोडारे, ईएसआयसीचे संचालक प्रणय सिन्हा, सीनिअर मेडिको डॉ.कांबळे, उपसंचालक आशुतोष गिरी, उपवैद्यकीय प्रतिनिधी सतीश ताजवे यांच्यासह ईएसआयसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. एकूणच रुग्णालय पुनर्बांधणीचे श्रेय शिवसेनेला जात आहे.