अजित मांडके,ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून ६०५ कोटी खर्चून रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतु सावरकर नगर भागात म्हाडा वसाहतीमध्ये चांगला सिमेंट रस्ता तोडून पुन्हा नव्याने तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्याला आता येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. रस्ता चांगला असतांना पुन्हा तो तोडण्याची गरज काय? असा सवालही रहिवाशांनी केला आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून महापालिका हद्दीत दोन टप्यात ६०५ कोटींच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यातील दोनही टप्यांची कामे अंतिम टप्यात असून येत्या १५ फेबु्रवारी पर्यंत ती कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. परंतु यापूर्वी देखील शहरातील काही भागात चांगला रस्ता असतांना देखील पुन्हा खोदण्यात येऊन नव्याने बांधण्यात आल्याचे दिसून आले होते. तर उपवन भागातही डांबरी रस्त्यावर पुन्हा डांबर टाकून रस्ता केल्याचेही समोर आले होते. आता तर सावरकर नगर भागात चक्क चांगल्या स्वरुपात असलेला सिमेंट रस्ता फोडण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे. येथील म्हाडा वसाहत भागात सध्या या रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
सिमेंट रस्ता फोडून पुन्हा सिमेंटचाच रस्ता तयार केला जात आहे. परंतु आधीचा रस्ता चांगला असतांना पुन्हा त्यावर खर्च कशाला असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. रस्त्याच्या कामाचा निधी सुलभ शौचालय व पाण्याच्या टाकीला खर्च करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन देखील आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सावरकर नगर म्हाडा वसाहत मधील जय महाराष्ट्र हॉटेल ते राजमाता सोसायटी मधील रस्ता चांगला असताना तोडण्याचे काम सुरु आहे. यामुळे म्हाडा वसाहत मधील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून आमच्या पैशाचा दुरूपयोग कशासाठी असा सवालही केला जात आहे. या विभागात अजून खूप कामे आहेत, सुलभ शौचालय पाण्याच्या, टाकीची कामे (पाणी वेळेवर न येणे) व कचऱ्याची समस्या, वाहतूक कोंडी अशीकामे असताना आमचा पैसा योग्य ठिकाणी, वापरा असे आम्ही आयुक्तांना सांगणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले. विनाकारण रहिवाशांना आम्ही कामे करतो विकासकामे करतो असे दाखवून रहिवाशांची फसवणूक करू नका. असे आवाहनही येथील रहिवाशांनी लोकप्रतिनिधींनी केले आहे.