लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग यांच्यावतीने सोमवारी मॅक्सस मॉल मैदानात अग्निशमन वाहने व साहित्यांचे प्रदर्शन भरवले होते. त्याचे उद््घाटन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज व ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील उपस्थित होते.नागरिकांना पालिकेच्या अग्निशमन दलाची क्षमता व आपत्कालीन परिस्थितीत दलाचे कार्य कसे चालते, याची माहिती देण्यासाठी हे प्रदर्शन भरवले होते. प्रदर्शनात अग्निशमन विभागात वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यांसह बचावासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांची आयुक्तांनी पाहणी करत त्यातील उणिवा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यासाठी दैनंदिन सरावाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करत ते सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आयुक्तांनी प्रत्येक कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करत अग्निशमन दलाला सक्षम करण्यासाठी अधिकाधिक साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विभागाचे प्रमुख व उपायुक्त दीपक पुजारी यांना दिल्या. अग्निशमन दलात समाविष्ट असेलल्या एकमेव परदेशी बनावटीची टर्न टेबल लॅडर या महागड्या गाडीच्या कार्याची माहिती त्यांनी घेतली. सुमारे ६० मीटर उंचीपर्यंत जाणाऱ्या या गाडीतील शिडीतून आयुक्तांसह पोलीस महानिरीक्षक व अधिक्षकांनी प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला. येत्या काही दिवसात सुमारे ७० मीटर उंचीपर्यंत जाणारी नवीन परदेशी बनावटीची गाडी दाखल होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. प्रभाग सभापती मदन सिंह, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, ध्रूवकिशोर पाटील, डॉ सुशील अग्रवाल, कांचना पुजारी, मर्लिन डिसा, रशिदा काझी, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, नगररचनाकार दिलीप घेवारे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, मुख्य लेखाधिकारी शरद बेलवटे, विधी अधिकारी सई वडके, क्रीडा अधिकारी दिपाली पोवार, जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत आदी उपस्थित होते.
भाईंदरमध्ये अग्निशमन दलाच्या वाहनांचे प्रदर्शन
By admin | Published: May 23, 2017 1:33 AM