भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यां विरोधात काँग्रेसचे पालिका मुख्यालया समोर धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:32 PM2021-09-23T18:32:13+5:302021-09-23T18:32:52+5:30
Bhiwandi News: भिवंडी शहरात सुरू असलेले भुयारी गटार योजना व रस्त्यांचे काँक्रीटीकरण यामुळें अनेक रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याने येथील रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत
- नितिन पंडीत
भिवंडी - पावसाळा आला की भिवंडी पालिका क्षेत्रातील रस्त्यांना खड्ड्यां मुळे जणू तलावांचे रूप येत असून या खड्ड्यां मुळे वाहन चालक , पदचारी, प्रवासी सर्वच त्रस्त असून त्या विरोधात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालया समोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
भिवंडी शहरात सुरू असलेले भुयारी गटार योजना व रस्त्यांचे काँक्रीटीकरण यामुळें अनेक रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याने येथील रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे पडले असून गणपती उत्सवा दरम्यान शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी करून ही प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शहरवासीयांमध्ये मनपा प्रशासना विरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे . या खड्डेमय रस्त्यांबाबत भिवंडी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ गुरुवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी खासदार सुरेश टावरे, नगरसेवक सिराज ताहीर मोमीन,फराज बाहुद्दीन, वसीम अन्सारी ,शहाफ मोमीन,अश्रफ मुन्ना ,पदाधिकारी सोहेल खान ,रुक्साना कुरेशी ,रेहाना अन्सारी ,हर्षली म्हात्रे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर अन्सारी ,ओबीसी आघाडी अध्यक्ष अनंता पाटील, युवक अध्यक्ष अरफात खान यांसह मोठया संख्येने कार्यकर्ते स्त्री पुरुष सहभागी झाले होते.
शहरातील रस्ते व उड्डाणपूल येथे खड्डे पडल्याने संपूर्ण शहरात सदैव वाहतूक कोंडीचा सामना नागरीकांना करावा लागत आहे .तर खड्ड्यां मुळे वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने तो अधिकच आर्थिक भुर्दंड वाहन चालकांना सोसावा लागत असल्याने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यानी पालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला .त्यानंतर उशिरा पालिका मुख्यालयात निवेदन देत तात्काळ खड्डे बुजविले न गेल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने मनपा प्रशासनास देण्यात आला आहे.