नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : महानगरपालिकेत डीप क्लीन ड्राईव्ह च्या माध्यमातून पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडल्याने ताण येऊन स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून त्या विरोधात पालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने पालिका मुख्यालया समोर निदर्शने करीत कर्मचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार सामनेवाले अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,उपायुक्त दिपक झिंजाड,आरोग्य विभाग सहाय्यक आयुक्त फैसल तातली,आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणे बाबत मागणी केली आहे.
भिवंडी पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सध्या अतिरिक्त स्वच्छतेचे काम करावे लागत आहे.या बाबत भिवंडी पालिका कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीने पालिका प्रशासनाला बॅचच्या नावाखाली सकाळी सात ते दुपारी तीन वाजता पर्यंत काम करावे लागत आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडला आहे. या बाबत संघटनेच्या वतीने पालिका प्रशासनाला आगावू कळवून ही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतोष चिंतामण जाधव रा. शेलार या कामगाराचा अतिश्रम केल्याने रक्ताची उलटी होऊन चार दिवसांनी मृत्यूशी झुंज देत रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राणज्योत माळवली.या घटने नंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाले आहे.
त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्यूनसिपल मजदुर युनियन,भारतीय कामगार कर्मचारी महासंघ,अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन,रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड,महाराष्ट्र कस्ट्राईब कर्मचारी महासंघ,शासकीय वाहन चालक भिवंडी युनिट च्या माध्यमातून पालिका मुख्यालया समोर निदर्शने केली.या आंदोलना नंतर पालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त फैसल तातली यांनी निवेदन स्वीकारून कर्मचारी महासंघा सोबत आयुक्तांच्या बैठकीचे नियोजन मंगळवारी केल्याची माहिती दिली.