ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्यांची आणि गटारांची कामे चालू असून याठिकाणी पावसाचे पाणी साचून गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये दिवा येथे एक महिला, मुंब्य्रात शाळकरी मुलगा, तर ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात एक ज्येष्ठ नागरिक तुंबलेल्या गटारामध्ये पडून जखमी झाले. केवळ त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. या तीनही ठिकाणी धोक्याची सूचना देणारे कोणत्याही प्रकारचे फलक महापालिका प्रशासनाने लावलेले नाहीत. त्यामुळे या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी धर्मराज्य पक्षाने महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
ठाणेकर नागरिक महानगरपालिकेला जो कर भरतो, त्यामधून माफक नागरी सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा असताना, महानगरपालिकेतील अधिकारी, कंत्राटदार यांच्या गलथान कारभारामुळे एखाद्या नागरिकाचा जीव जाऊ शकतो. अशा प्रकारे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल यावेळी विचारण्यात आला. दरम्यान, उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले असतानादेखील, ही कामे अपूर्ण कशी राहतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या तीनही घटनांमध्ये जे संबंधित अधिकारी जबाबदार असतील, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच घटनांमधील ठेकेदारांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून, त्यांना काळ्या यादीत टाकावे, ज्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फेरस्त्यांची, गटारांची कामे चालू असतील, तेथे तत्काळ धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात यावेत. उघड्या गटारांवर झाकणे टाकावीत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेट नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी भरपावसात मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली. परंतु, त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप देशपांडे यांनी केला.