वाडा : तुटलेले शेड, फुटलेले पत्रे, ढासळलेले चिरे, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची वानवा... ही परिस्थिती आहे वाडा तालुक्यातील स्मशानभुमीची. मुळात तालुक्यातील ४० टक्के गावांत स्मशानभुमीची सुविधाच नाही. त्यामुळे ओहळ व नदीच्या काठांवर अंत्यविधी करावे लागत असल्याने मृत्यूनंतरही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मात्र या महत्वाच्या गोष्टीकडे प्रशासन गांभीर्याने पाहतच नाहीत.तालुक्यात औद्योगिकरण वाढत असल्याने जमिनीचे भावही गगनाला भिडले आहेत. तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमधील स्मशानभुमीच्या जागा उद्योजकांनी गिळंकृत केल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींना शासनाच्या जनसुविध योजनेमधून निधी मंजुर झाला आहे. मात्र जागेअभावी तो निधी परत जाण्याची वेळ आली आहे.चिंचघर ग्रामपंचायतीकडे स्मशानभुमीसाठी दोन वर्षपूर्वी निधी मंजुर होवून स्मशानभूमीसाठी रस्ता करण्यात आला. मात्र जागेचे कारण दाखवून स्मशानभुमीचे काम होवू शकले नाही. निधी पडून आहे. त्यामुळे नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर देवघर गावाची स्मशानभुमी पूर्णपणे नादुरूस्त असून ग्रामपंचायतीच्या उदासिन भुमीकेमुळे ती दुरूस्त होत नसल्याचे येथील ग्रामस्थ किशोर पाटील यांनी सांगितले. डाकिवली गावातील स्मशानभुमी नदीच्या काठावर बांधली असून गेल्या वर्षी नदीच्या पुराच्या पाण्यात ही स्मशानभूमी पूर्णपणे उखडली गेली होती. त्यामुळे शासनाच्या लाखो रू. चा निधी पाण्यात जावून या वर्षी पुन्हा खर्च करून नवीन स्मशानभूमी त्याच ठिकाणी घेतल्याने या कामांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी चिरीमिरी घेवून कामे मंजुर करतात का असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असून यावर्षी पुन्हा नदीला पुर आला तर ही नवीन बांधलेली स्मशानभुमी पुन्हा उखडून शासनाचा खर्च झालेले लाखो रू. पाण्यात जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
स्मशानभूमीच्या जागा उद्योजकांनी लाटल्या
By admin | Published: December 12, 2015 12:51 AM