भिवंडी : जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा सर्व समाज घटकांकडून तीव्र निषेध नोंदवला जात असताना,सर्वत्र निषेधार्थ आंदोलन होत आहेत. भिवंडी शहरात सकल मराठी समाजा तर्फे अध्यक्ष साईनाथ पवार कार्याध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत राज्य सरकार पोलिस प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
राज्य सरकारने या लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून या लाठी हल्ल्यात जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जालना पोलिस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी कार्याध्यक्ष सुभाष माने यांनी केली.या आंदोलना नंतर सकल मराठा समाज भिवंडी शहर अध्यक्ष साईनाथ पवार,कार्याध्यक्ष सुभाष माने,खजिनदार अशोककुमार फडतरे,सचिव दीपक कदम प्रमुख पदाधिकारी अरुण राऊत, प्रवीण पाटील,भूषण रोकडे यांनी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन सुपूर्द केले .