ठाणे: राज्य आणि केंद्र सरकारने संविधान दिन आणि महापरिनिर्वाण दिन याबाबत काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात येणार नाही, त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान घटना समितीचे अध्यक्ष तथा प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले होते. हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संविधान दिनाचे कार्यक्रम सादर करण्यात येणार नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने ठामपा मुख्यालयासमोर निदर्शने करुन संविधान दिन साजरा करण्याची मागणी केली.
दरम्यान, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन राज्य आणि केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. अशी लोकशाहीला मानणार्या लोकांची इच्छा असते. मात्र, कालच राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संविधान दिन साजरा करण्यास मज्जाव केला आहे. महापरिनिर्वाण दिनी तसेच संविधान दिनी आंबेडकरी अनुयायांनी घरातच रहावे, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. आम्हाला मान्य आहे की, कोरोनामुळे जनता सुरक्षित नाही. पण, या भारतामध्ये बिहारची निवडणूक झाली, गणेशोत्सव -नवरात्र- दिवाळी असे उत्सव साजरी करण्यात आले.
मंदिरे उघडण्यात आलेली असताना, अन् संविधान दिन साजरा करण्याबाबत केंद्र सरकार दडपशाही करीत आहे. हा अन्याय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सींगचा वापर करुन राज्य- केंद्र सरकारने पालिकांना संविधान दिन साजरा करण्याचे आदेश द्यावेत; अन् पालिकांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून संविधान जनजागृती अभियान राबवून त्याचे प्रसारण मोठ्या पडद्याद्वारे करावे, अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी केली. यावेळी किसन पाईकराव, संदीप शेळके, वैभव जानराव, गुलाब ठोके, संभाजी काचोळे, हरीभाऊ हनवते, अमोल पाईकराव, गोपाळ विश्वकर्मा, दशरथ आठवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.