ठाणे : ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी यात पालघर जिल्हा ग्रंथालय संघही यात सहभागी होता. नवीन ग्रंथालयांना मान्यता, सार्वजनिक ग्रंथालयांचे दर्जाबदल, अनुदान वाढ आणि सेवकांचे वेतन या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जव्हार, तलासरी, विरार, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, कल्याण, नवी मुंबई येथून ग्रंथालय सेवक व पदाधिकारी, तसेच, ठाणे शहरातील सर्व ग्रंथालये सहभागी झाले होते. ग्रंथालयांच्या समस्या या केवळ त्यांच्या समस्या नसून सामाजिक आणि सांस्कृतिक आहेत. त्या वेळेवर सुटणे आवश्यक आहे. अन्यथा सांस्कृतिक अभिसरण धोक्यात येईल. तेव्हा शासनाने याकडे सहानुभूतीने न पाहता कर्तव्याच्या भावनेने पहावे असे कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती यांनी या आंदोलनादरम्यान व्यक्त केले. पालघर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह प्रकाश चुंबळे, माणिकराव किर्तन वाचनालय, नवी मुंबईचे सुभाष कुलकर्णी, यशवंत वाचनालय, जव्हारचे कांचन चुंबळे, मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर, चित्रा कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केले. राज्य ग्रंथालय संघाने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याच्या निर्णयाप्रमाणे ठाण्यातही हे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्हाकिारी यांना देण्यात आले. यावेळी वैती, चांगदेव काळे, रमेश वनारसे, कांचन चुंबळे , श्रावणी फाटक यांचा शिष्टमंडळात सहभाग होता. ग्रंथालयांच्या मागण्यांविषयी जिल्हाधिकारींनी आस्था दाखविली असून त्या मागण्या शासनाकडे पोच करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती काळे यांनी दिली.