ठाणे : आरक्षणाची जाणीव करून देण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने भंडारा उदळला. त्यामुळे या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ् धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जाेरदार निदर्शने केली. या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले. मारहाण करण्याच्या घटनेतील संबंधीतांवर त्वरीत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी आंदाेलनकर्त्यांनी केली. या मागणीसह धनगर आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा यासह अन्यही मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, जिल्हा अध्यक्ष संदीप माने,अनिता हिलाळ, वर्षा माने, मंगल कोळेकर,उज्वला गलांडे,धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,अजय हक्के,सन्नी कोकरे,वसंत किनगे,दिगंबर लवटे,नरहरी कोकरे,गोविंद माने,नरेश शिरगिरे,योगेश तरडे,पंडित परदेशी,गणेश गढरी,रमेश परदेशी,विजय मनोरे,भूषण लांडगे,मयूर नंदाळे,राकेश परदेशी,आदींंनी या आंदाेलनात सहभाग घेतला.
धनगर समाजाला एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण लागू करून अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र देणे, मेंढपाळ बांधवांना वन संरक्षण कायदा मंजूर करा. प्रत्येक जिल्हयात एक हजार हेक्टर वन जमीन उपलब्ध करून द्या,ओ. बी. सी समाजाचे आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणे, मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समाेर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यास मारहाणी झाली. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या आदी विविध मागण्यां यावेळी आंदाेलनकर्त्यांनी केल्या.