ठाणे : नौपाड्यात चार दिवसांत डेंग्यूचे १५ रुग्ण आढळले असताना आता घोडबंदर भागातही त्याने आपले डोके वर काढले आहे. मानपाड्यातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या दोघांना आता त्याची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश असून तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल घेऊन आरोग्य विभागाने या भागात औषध आणि धूर फवारणीस सुरुवात केली आहे.मुंबईत लेप्टोमुळे १५ जणांना जीव गमवावा लागला असताना ठाण्यात साथीचे आजार आटोक्यात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला होता. परंतु, आता त्यांचा हा दावा केवळ एका आठवड्यातच फोल ठरला आहे. ठाण्यात एकापोठापाठ एक डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून घरोघरी जाऊन स्वच्छतेची माहिती घेतली जात असून रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी गोळा केले जात आहेत. मानपाडा आरोग्य केंद्रातही सध्या सकाळपासून दुपारपर्यंत लांबचलांब रांगा लागत असून त्या ठिकाणी ताप, सर्दी, जुलाब अशा प्रकारच्या रुग्णांचा अधिक भरणा होत असल्याची माहितीयेथील डॉक्टरांनी दिली. एकूणच जानेवारी ते जुलै १८ तारखेपर्यंत शहरात ४९ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)
मानपाड्यात आढळले डेंग्यूचे रुग्ण
By admin | Published: July 18, 2015 11:53 PM