डोंबिवली- जॅकलीन शाळेच्या संचालिका हर्षदा भोईर यांच्या मुलाला शाळा प्रवेशाच्या वेळी एका मान्यताप्राप्त शाळेने प्रवेश नाकारला होता. त्या इर्षेने भोईर दाम्पत्यांनी स्वत:ची शाळा काढली. यावर्षी प्रथमच या शाळेतील मुले दहावीची परिक्षा देणार आहेत.
हर्षदा या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 57 जयहिंद कॉलनी येथील नगरसेविका आणि विद्यमान स्थायी समिती सदस्या आहेत. राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हयातील ज्येष्ठ नेते कै. सुदाम भोईर यांचे सुपुत्र आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. पंडित भोईर यांचे पुतणे हदयनाथ भोईर यांच्या हर्षदा पत्नी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भोईर कुटुंबीय डोंबिवली पश्चिम विभागातील जयहिंद कॉलनी प्रभागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. भोईर यांनी त्या मान्यताप्राप्त शाळेत मुलाला प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले तरीही त्यांच्या पदरी निराशाच पडली. आपल्यासारख्या व्यक्तींना प्रवेश मिळताना एवढा त्रस होत असेल तर सर्वसामान्यांना किती त्रास होत असेल यांचा विचार करून या दाम्पत्यांनी शाळा काढण्याचा विचार केला.
सुरूवातीला जॅकलीन नर्सरी सुरू केली. आज त्या छोटया रोपटयाला फांद्या फुटल्या आहेत. या शाळेतील मुले यंदा प्रथमच दहावीची परिक्षा देणार आहेत. इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर सुमारे 35 शिक्षकवृंद हर्षदा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यादानाचे कार्य करीत आहे. हर्षदा यांनी केवळ शाळाच काढली नाही तर त्यांनी त्याचबरोबर एमटीडीसी हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर डीएडचे शिक्षण घेतले.
या शाळेत कुणालाही प्रवेश नाकारला जात नाही किंवा फीसाठी कोणत्याही विद्यार्थ्याची अडवणूक केली जात नाही. या शाळेत विद्यार्थ्यांना माफक फी ठेवण्यात आली आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कला आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझेही आम्ही आधीपासूनच कमी केलेले आहे, असे ही हर्षदा यांनी यावेळी सांगितले.